Sunday, December 2, 2012


सिर्फ फर्निचर पे खर्चा किया है!!!


सर्वात महत्त्वाचं म्हणजे, समजा, मी व्हिक्टिम आहे आणि माझ्या संपर्कात पोलीस अधिकारी आला, तर मी त्याला फक्त क्ल्यू का देईन, त्याला थेटच सांगेन ना. आता त्यातून दिग्दर्शिकेला असही दाखवायचं असेल की, व्हिक्टिमला गुन्हेगाराचा बदला स्वत: घ्यायचाय आणि तोही एका विशिष्ट प्रकारे घ्यायचाय म्हणून व्हिक्टिम एक लाँग रूट घेत आहे. असं असेल तर पोलीस अधिकारीच का, हे म्हणजे जरा अतिच आहे.
अविश्वसनीय घटना यापूर्वीही सिनेमांतून दाखवल्या गेल्या आहेत आहेत, त्या स्वीकारल्याही आहेत. त्या स्वीकारल्या जातील, अशा पद्धतीने दाखवल्या तरच पटू शकतात नाही तर हास्यास्पद होतात. दुर्दैवाने तलाशमधलं अज्ञाताचं लॉजिक पटलेलं नाही.

रंगीलामध्ये आमीर खाननेच मारलेला हा डायल़ॉग चांगलाच लक्षात असेल. त्याला खायला डिश मिळत नाही, पण हॉटेलमध्ये बाकी सगळं असतं. तलाशच्या तांत्रिक बाजूंपासून, अभिनय, संगीत, गाणी सगळं चागलं आहे, फक्त कथेने अपेक्षाभंग केला आहे.

अज्ञाताचं प्रत्येकालाच आकर्षण असतं. एखादा अपघात, त्या अपघातामागचे (किंवा हत्या) कारण, मिळणारे दुवे, दुवे मिळाल्यानंतर रहस्याची उकल होण्याऐवजी वाढणारी गुंतागुंत यामुळे या अज्ञाताविषयी उत्कंठा अजूनच वाढते. एक शेवटचा धक्का बसतो आणि सत्य बाहेर येतं. ते सत्य समजलं की आपोआपच आपण एक सुटकेचा निश्वास टाकतो आणि हे अज्ञात ज्ञात व्हावे म्हणून घालवलेला वेळ सत्कारणी लागल्यासारखा वाटतो. पण काही वेळा हे सत्य इतकं अविश्वसनीय (वाईट अर्थाने) असतं की, या सगळ्या रोमांचक प्रवासातील, क्षणोक्षणी वाढत गेलेल्या उत्कंठेतील हवाच निघून जाते. तसंच काहीसं तलाश पाहिल्यावर झालं.
अरमान कपूर या प्रसिद्ध अभिनेत्याच्या गाडीला वरळी सीफेसवर अपघात होऊन त्याचा मृत्यू होतो. या प्रकरणाचा छडा लावण्याची जबाबदारी शेखावत सुर्जनसिंग शेखावतवर (आमिर खान) आहे. शेखावत व्यक्तिगत आयुष्यात दु:खी आहे. कारण त्याच्या लहान मुलाचा  पाण्यात बुडून मृत्यू झालेला आहे. आपल्या निष्काळजीपणामुळे त्याचा मृत्यू झाला, असं वाटत असल्यामुळे त्याचं मन त्याला खातंय. त्याची पत्नी रोशनी (राणी मुखर्जी) ही सुद्धा त्यांच्या मुलाच्या मृत्यूने निराश झालेली आहे. या नैराश्यातून बाहेर येण्यासाठी ती मानसोपचारतज्ज्ञाकडून उपचार करून घेत आहे. यात भर म्हणून प्लँचेट किंवा तत्सम कर्म करून आत्म्यांशी बोलणारया किंवा आत्म्यांना काय सांगायचंय ते त्याच्या नातेवाईकांना सांगणाऱया बिलिमोरिया या महिलेकडे जाऊन ती आपल्या मुलाच्या भावना जाणून घेतेय किंवा एक प्रकारे मृत मुलाशी संवाद साधत आहे.
एकीकडे अरमान कपूरच्या अपघात प्रकरणात गुंतागुंत वाढून गुन्हेगार समोर येत नसल्याने शेखावत अस्वस्थ आहे. दुसरीकडे मानसोपचार तज्ज्ञाकडून उपचार घेण्याऐवजी आपली पत्नी भलत्याच मार्गाने मन:शांती मिळवण्याचा प्रयत्न करत असल्याने त्याच्या अस्वस्थतेच भरच पडत आहे.
आयुष्यातल्या या तणावपूर्ण टप्प्यावर शेखावतला रोझी (करीना कपूर) ही वेश्या भेटते आणि त्याला अरमान प्रकरणात काही महत्त्वाचे दुवे मिळू लागतात आणि व्यक्तिगत आयुष्यातील तणावापासून काहीसा दिलासा मिळतो.
आमीर खानचा चित्रपट असल्यामुळे साहजिकच मी सुरुवातीपासूनच चांगल्या ट्रीटची मानसिक तयारी केलेली असते. पहिल्या दृश्यानेच पुढील तीन तासांचा कॅनव्हास सेट झाला. रहस्यकथा पाहताना आधी रहस्य समजू नये अशी मनोमन इच्छा असली तरी रहस्य काय असेल याचे आडाखे बांधायला मात्र सुरुवात झालेली असते. मध्यंतरापर्यंत शेखावतच्या व्यक्तिगत आयुष्याभोवती, मुलाचा मृत्यू आणि पत्नी रोशनीच्या आत्मा प्रकरणामुळे निर्माण झालेलं गूढ वलय आणि प्रोफेशनल आयुष्यात अरमानच्या अपघाताविषयी गूढ दाखविण्यात आलंय. छायालेखन, संवाद चोख असल्याने मी कंटाळलो नाही. चित्रपटाने पकड घेतली पण ती पकड घट्ट होती असं मी म्हणणार नाही.
मध्यंतरानंतर प्रत्येक दुवा थोडा थोडा जुळत जातो. काही प्रश्न पडतात, पण त्याची उत्तरं मिळतील म्हणून मी काही प्रश्न मनातल्या मनात गिळून टाकले. ब्लॅकमेल, प्रकरणातील दुव्यांचा मृत्यू वगैरे नेहमीचे सोपस्कार पार पडत कथा सरकली आणि शेवटचा धक्का बसला. तीन सेकंद हा धक्का बसला आणि रहस्य उलगडलं. धक्क्यातून मी सावरलो आणि श्शी! हे होतं रहस्य असं काहीसं वाटलं. पूर्णपणे अपेक्षाभंग झाला. शेवट भलताच निघाला तरी काही वेळा आधीचा चित्रपट  आवडतो. (तनु  वेड्स मनुचा शेवट खूपच मेलोड्रामॅटिक होता, पण तो भाग वगळला तर चित्रपट आवडला होता) पण तलाशची कथा ज्या पायावर रचली आहे तोच मला इतका डळमळीत वाटला की, त्यातल्या रहस्याचंही काही वाटेनासं झालं.
चित्रपटाच्या सुरुवातीपासूनच्या फ्रेम्स खरंच चांगल्या आहेत. दिग्दर्शकाचा टचही काही ठिकाणी दिसलाय. म्हणजे शेखावतच्या विचारात नेहमी त्याच्या मुलाच्या मृत्यूपूर्वीचे दृश्य दिसत असते. एकच दृश्य तीन वेळा दाखवलंय. पहिल्यांदा त्याचा मुलगा त्याच्याकडे थोडं लाब जायची परवानगी मागतो, शेखावत काही न बोलता झोपून राहतो. इथूनच पुढे अपघात घडतो. दुसऱयांदा तेच दृश्य शेखावत पुन्हा बघतो पण यावेळी तो त्याच्या मुलाला परत बोलावून तिथेच बैठा खेळ खेळायला सांगतो. तिसऱयांदा तेच दृश्य दिसते. यावेळी तो स्वत: त्याच्या मुलासोबत जातो. ही नंतरची दोन दृश्य ही मी असं केलं असतं तर ही भावना दाखवणारी आहेत. अस्वस्थ शेखावतची नक्की मनस्थिती कशी आहे हे ही दृश्य दाखवतात. हा लेखिका आणि दिग्दर्शिकेचा खास टच. पण बिलिमोरिया नावाची आत्म्यांशी बोलणारी बाई शेखावतच्या घरी घरी कशी येते याचा काहीच शेंडा बुडखा नाही. ते सगळं प्रेक्षकांनी समजून घ्यायचं, अशी दिग्दर्शिकेची अपेक्षा आहे. मध्यंतरापर्यंत चित्रपटाचा वेग कमी आहे. अभिनयाच्या बाबतीत नवाजुद्दिन सिद्दीकी, आमीर, राणी, करिना.. सगळेच झकास. फक्त खटकते ती या चित्रपटाची कथा. त्यामुळेच बाकी सगळ्याची माती झाली.
रहस्यपट असल्यामुळे रहस्य उघड करू शकत नाही. पण काही मुद्दे खटकले. शेखावतचे सहकारी सांगतात की, या रस्त्यावर यापूर्वीही असे अनेक अपघात झाले आहेत. पण शेखावत इतिहासात अजिबातच डोकावून पाहत नाही. एकाच प्रकारे अनेक अपघात होत असतील तर पोलीस अधिकारी म्हणून त्याने नक्कीच त्या अपघातांचाही इतिहास पाहिला असता. सर्वात महत्त्वाचं म्हणजे, समजा, मी व्हिक्टिम आहे आणि माझ्या संपर्कात पोलीस अधिकारी आला, तर मी त्याला फक्त क्ल्यू का देईन, त्याला थेटच सांगेन ना. आता त्यातून दिग्दर्शिकेला असही दाखवायचं असेल की, व्हिक्टिमला गुन्हेगाराचा बदला स्वत: घ्यायचाय आणि तोही एका विशिष्ट प्रकारे घ्यायचाय म्हणून व्हिक्टिम एक लाँग रूट घेत आहे. असं असेल तर पोलीस अधिकारीच का, हे म्हणजे जरा अतिच आहे.
अविश्वसनीय घटना यापूर्वीही सिनेमांतून दाखवल्या गेल्या आहेत आहेत, त्या स्वीकारल्याही आहेत. त्या स्वीकारल्या जातील, अशा पद्धतीने दाखवल्या तरच पटू शकतात नाही तर हास्यास्पद होतात. दुर्दैवाने तलाशमधलं अज्ञाताचं लॉजिक पटलेलं नाही.
घोड्याचं खोगीर छान आहे, लगाम उत्तम चामड्यापासून तयार केलेला आहे, नाल सोन्याची आहे, त्याच्या आयाळीचा आणि शेपटीचाही भांग छान पाडलेला आहे, पण मूळात घोड्यातच दम असेल तर बाकी सगळ्या डेकोरेशनचा काय फायदा?

Sunday, October 16, 2011

My Friend Pinto


माय (वेस्ट) फ्रेंड पिंटो!

भारतीयांची मानसिकता निमूटपणे स्वीकारणाऱयांची आहे. पेट्रोलचे वाढलेले भाव शिष्टाचार झालेला भ्रष्टाचार, फुटलेली जलवाहिनी, बहुतांश वेळा उशीरा असलेली ट्रेन, रस्त्यावरचे खड्डे हे सर्व आपण निमूटपणे स्वीकारतो. हाच भारतीय जेव्हा प्रेक्षकाच्या भूमिकेत असतो तेव्हाही तो आपली समंजस (?) वृत्ती सोडत नाही. फार पूर्वी, दुसऱया मजल्यावरून उडी मारून दोन पायावर उभा राहणारा नायकही, नायकाच्या एका ठोशात झाडावर जाऊन लटकणारा गुंड, दोन मुलांना दोन बाजूला घेऊन दोन इमारतींमधील दोरीवरून कसरत करून जाणारा एका पायाने अधू असलेला डॉनमधील जसजीत ऊर्फ जेजेही (प्राण) आपण स्वीकारला. विनोदी चित्रपट या नावाखाली दाखविण्यात आलेला बालिशपणा तर भारतीय प्रेक्षकांनी अनेकदा स्वीकारला आहे आणि अजूनही स्वीकारत आहोत. याच स्वीकरण्याच्या वृत्तीला गृहित धरून माय फ्रेंड पिंटो तयार करण्यात आला आहे. प्रतीक बब्बर असल्यामुळे तो चित्रपट पाहावा, एवढे फॅन फॉलोइंग त्याला अजून मिळालेले नाही. पण निर्मात्याच्या भूमिकेत असलेला संजय लीला भन्साली आणि नायिका कल्की कोचलीन या दोन नावांमुळे आपल्याला माय फ्रेंड पिंटोविषयी उत्सुकता वाटते आणि आपण भुलतो. पण चित्रपट सुरू झाल्यापासून संपेपर्यंत एकच प्रश्न आपल्याला सतावत राहतो... का रे भुललासी?’ आणि माय फ्रेंड पिंटो म्हणण्याऐवजी माय वेस्ट फ्रेंड पिंटो असे म्हणावे लागते.

मायकल पिंटो (प्रतीक बब्बर) त्याचा मित्र समीरच्या (अर्जुन माथुर) घरी राहण्यासाठी म्हणून मुंबईत दाखल होतो. त्याच्या धसमुसळ्या स्वभावामुळे पिंटो राहायला येणे हे समीरला संकटच वाटत असते. मुंबईत आगमन झाल्यापासूनच त्याच्या धसमुसळेपणाची झलक दिसू लागते. याच स्वभावामुळे पिंटो विविध प्रसंगात अडकत जातो. हा नकोसा मित्र अखेर सर्वांना हवाहवासा कसा होतो, याची कहाणी म्हणजे माय फ्रेंड पिंटो.

संजय लीला भन्साळी या चित्रपटाचा निर्माता असला तरी मुळात तो दिग्दर्शक आहे. त्यामुळे कशा प्रकारची पटकथा, पात्रे आपल्या चित्रपटात दाखविली जातात यावर त्याचे थोडे लक्ष असणे अपेक्षित होते. आमीर खान किंवा विशाल भारद्वाजची निर्मिती असलेल्या चित्रपटावर त्यांची एक छाप जाणवते. तशी ती असणे हे चूक की बरोबर हे वादाचा मुद्दा असू शकेल. परंतु, तशी छाप पडल्याने चित्रपटाचे भले होत असेल तर ही लुडबुड नक्कीच स्वागतार्ह असते. माय फ्रेंड...कडे मात्र भन्सालीने अजिबात दुर्लक्ष केले असावे असे वाटते.

चित्रपटाच्या सुरुवातीला पडद्यावर दिसणारा डॉन, त्याचा सहकारी, दोन पंटर या व्यक्तिरेखा इतक्या अतिरंजित आणि अवास्तव आहेत की, चित्रपटाची एकूण मांडणी कशी असेल याचा अंदाज प्रेक्षकांना येतो. जसजशी कथा पुढे सरकते, तसतसे एकामागून एक अशी अनेक अतिरंजित आणि अवास्तव पात्रे समोर येतात. फार्सिकल शैली गृहित धरली तरी तिचा वापरही सावधपणेच करावा लागतो नाहीतर हसू येण्याऐवजी ती शैली हास्यास्पद होते. माय फ्रेंड... मध्ये नेमके हेच झाले आहे.

पटकथेच्या नावाखाली एकामागून एक घटना जोडायच्या आणि शेवटी त्या घटनांमधील सर्व पात्रांना एका ठिकाणी आणून ती कथा संपवायची हा फॉर्म्युला प्रियदर्शनच्या अनेक चित्रपटांत आपण अनेकदा पाहिला आहे. काही वेळा तो चालला आणि काही वेळा सपशेल फसला. माय फ्रेंड...मध्येही हा फॉर्म्युला वापरण्याचा एक अपयशी प्रयत्न झाला आहे.

मायकल पिंटोचा धसमुसळ्या स्वभाव प्रतीक बब्बरचा प्रयत्न बराचसा यशस्वी झाला आहे. माणूस कितीही धसमुसळा असला तरी तो काही पाडल्यावर किंवा तोडल्यावर समोरच्याची माफी मागतो, परंतु हे सौजन्य पिंटोने दाखवावे असे दिग्दर्शकालाही वाटले नाही आणि प्रतीकलाही नाही. पण तरीही त्याचा प्रयत्न चांगला आहे. राज झुत्शी मात्र उगाचच अति आक्रस्ताळा आहे. परंतु, त्याच्या तसे असण्याला दिग्दर्शकच कारणीभूत आहे. कल्की कोचलीन केवळ नाममात्र नायिका आहे. प्रतीकला साजेशी दिसेल अशी नायिका आणि प्रेक्षकांमध्ये किमान उत्सुकता निर्माण व्हावी यासाठी तिची या भूमिकेसाठी वर्णी लागली असावी. मकरंद देशपांडे (डॉन), दिव्या दत्ता (डॉनची प्रेयसी रेश्मा) यांनी आपापली जबाबदारी पार पाडली आहे. परंतु त्यात उल्लेखनीय असे काहीही नाही.

गाणी ऐकताना बरी वाटतात पण चटकन ओठावर रुळत नाहीत. संवादांमध्येही कृत्रिम विनोद करण्याचा प्रयत्न केला आहे. मेरे अंकल अल्बर्ट पिंटो पे पिक्चर बनाया गया था, असे मायकल पिंटोने म्हणणे यातूनच संवादलेखकाची समज कळून येऊ शकेल. खरे तर या कथेतून एक चांगला फार्सिकल चित्रपट तयार होऊ शकला असता. परंतु, पटकथा लेखक आणि दिग्दर्शकाने चित्रपटात अतर्क्य घटनांचा अतिवापर केल्याने चित्रपट बालिशपणाकडे झुकला आहे. एकूण काय तर, असे चित्रपट पाहून हसू येणारे किंवा कशी का असेना पण चार घटका करमणूक होत आहे ना, मग आहे ते स्वीकारणाऱयांपैकी तुम्ही असाल तरच हा चित्रपट तुमचे थोडेफार मनोरंजन करू शकेल.

सुनील डिंगणकर